साहित्याची पायवाट

शुक्रवार, ४ ऑक्टोबर, २०१३

आचार्य अत्रे

                                आचार्य अत्रे

---------------
क-हाकाठचे साहित्यरत्न
-----------------
लेखक- दशरथ यादव


मराठी साहित्यक्षेत्रात मैलाचा दगड ठरावा असे अचाट काम करणारे साहित्यसम्राट प्रल्हाद केशव अत्रे (इ.स.१३ आॅगस्ट १८९८ - इ.स१३ जून १९६९) यांचे मूळ गाव कोडीत. पुरंदर तालुक्याचे भाग्यविधाते व पहिले आमदार बापूसाहेब खैरे यांचेही तेच मूळ गाव. छत्रपती शिवाजी महाराजांचा वैभवशाली पराक्रमाचा वारसा जतन करणारा पुरंदर किल्ला सोबतीला. संत सोपानदेव व छत्रपती संभाजीमहाराज यांच्या रुपाने साहित्याचा प्रवाह क-हेतून सदैव खळखळत आहे. शौर्य, पराक्रम, अध्यात्माचा वारसा अंगाखांद्यावर खेळवीत दिमाखात उभ्या असलेल्या शिवशंभुच्या पुरंदराची प्रेरणा हीच आचार्य अत्रे यांच्या लेखनाची ताकद आहे.
आचार्य अत्रे हे वक्ता, पत्रकार, लेखक, चित्रपटकार, विडंबनकार, शिक्षणतज्ञ, नाटककार, राजकारणी यासगळ्या क्षेत्रावर त्यांचा प्रभाव होता. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील एक नेते म्हणूनही त्यांनी प्रभाव पाडला होता.

आल्याड क-हा अन पल्याड नीरा
हा शिवशाहीचा झरा रं
शिवशंभूचा पुरंदर म्हणजे
मोतियाचा तुरा रं
अशी महती असणारा पुरंदरचा क-हा पठार हा सह्याद्री पवर्वताच्या दोन समांतर रांगाच्या मधल्याभागात व्यापून गेला आहे..पुरंदर किल्ल्याच्या पुर्वेला जाणारी एक पर्वत रांग जेजुरीच्या खंडोबाच्या कडेपठारगडापर्यंत जाते. दुसरी रांग बोपदेवघाट, दिवेघाटापासून पुवेला भुलेश्वर मंदिरापर्यंत जावून लोप पावते. या रांगेवर मल्हारगड, ढवळगड व दौलतमंगळगड हे तीन किल्ले तसेच कानिफनाथाचेही मंदिर आहे. क-हाकाठावरील ५२ सरदारांच्या जीवावर पेशवाई तगून होती.

चित्रपट व पत्रकारिता

इ.स. १९३४ साली सरस्वती सिनेटोनच्या दादा तोरण्यांच्या आग्रहाखातर नारद-नारदी चित्रपटाची कथा व संवाद अत्र्यांनी लिहून दिले. 'हंस पिक्स्चर्स'साठी इ.स. १९३७ साली त्यांनी इब्सेनच्या 'पिलर ऑफ द सोसायटी' या कथेवरून धर्मवीर, स्वतःच्याच कथांवरून प्रेमवीर ह्या मराठी व 'बेगुनाह' ह्या हिंदी चित्रपटांच्या पटकथा लिहून दिल्या. इ.स. १९३८ साली 'हंस'साठीच 'ब्रह्मचारी' चित्रपटाची कथा त्यांनी लिहून दिली. त्यांनी लिहिलेला 'ब्रँडीची बाटली' हा चित्रपटही लोकप्रिय ठरला.
अत्र्यांनी राजगुरू व अभ्यंकर या इतर दोन भागीदारांसोबत एआरए या नावाने 'नवयुग चित्रपट कंपनी' काढली. पुढे 'हंस पिक्चर्स'मधले मास्टर विनायक, पांडुरंग नाईक, बाबूराव पेंढारकर हेदेखील भागीदार झाल्यावर या कंपनीने ’नवयुग पिक्चर्स’ असे नाव बदलून घेतले. इ.स. १९४० साली नवयुग पिक्चर्सतर्फे 'लपंडाव' चित्रपटाची कथा अत्र्यांनी लिहिली. 'लपंडाव' चित्रपटानंतर त्यांनी 'संत सखू' या चित्रपटाचे संवाद लिहिले. परंतु 'प्रभात'ने ही हाच विषय घेतला आहे या कारणाने मास्टर विनायकांनी त्याला विरोध केला. नवयुग पिक्चर्सने मग वि.स. खांडेकरांची 'अमृत' ही कथा घेऊन चित्रपट काढावयाचे ठरवले. या वादामुळे अत्र्यांनी नवयुग पिक्चर्स सोडले.
अत्र्यांनी दिग्दर्शित केलेल्या "श्यामची आई" चित्रपटाला १९५४ साली सुरू झालेल्या "राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार" सोहोळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे पहिले "सुवर्ण कमळ" मिळाले होते.
इ.स. १९२३ साली अत्र्यांनी 'अध्यापन' मासिक सुरू केले. इ.स. १९२६ मध्ये 'रत्नाकर' व इ.स. १९२९ साली 'मनोरमा', आणि पुढे इ.स. १९३५ साली 'नवे अध्यापन' व इ.स. १९३९ साली 'इलाखा शिक्षक' ही मासिके काढली. जानेवारी १९, १९४० साली त्यांनी नवयुग साप्ताहिक सुरू केले. जुलै ८, इ.स. १९६२पर्यंत ते चालू होते. जून २, इ.स. १९४७ रोजी अत्र्यांनी जयहिंद हे सांजदैनिक सुरू केले; परंतु ते वर्षभरच चालले. नोव्हेंबर १५, इ.स. १९५६ रोजी त्यांनी मराठा हे दैनिक सुरू केले. ते त्यांच्या हयातीनंतरही काही काळ प्रकाशित होत होते.

मुंबईत पहिले सहा महिने सँढर्स्ट हायस्कूलमध्ये इंग्रजी व गणित शिकवले, व नंतर रॉबर्ट मनी स्कूल मध्ये एक महिना वर्गशिक्षक व त्यानंतर फोर्टमधल्या न्यू स्कूल (भरडा न्यू हायस्कूल)मध्ये संस्कृत शिक्षक म्हणून नोकरी. पुण्याला कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत १८ वर्षे मुख्याध्यापक म्हणून लौकिक मिळवला. जून १९२४ साली मुंबईच्या सरकारी ट्रेनिंग कॉलेजमध्ये शिक्षणशास्त्राचे प्रशिक्षण घेऊन बी.टी. परीक्षेत वर्गात प्रथम आले. १९२७ ते १९२८ सालच्या दरम्यान इंग्लंडला टीचर्स डिप्लोमा मिळवला. पुण्यात राजा धनराज गिरजी व मुलींची आगरकर हायस्कूल यांची स्थापना केली. प्राथमिक शाळेसाठी "नवयुग वाचनमाला" व दुय्यम शाळेसाठी "अरुण वाचनमाला" ह्या दोन क्रमिक पुस्तकांच्या माला लिहिल्या. १९३७ साली पुणे नगरपालिकेत निवडून आल्यानंतर शिक्षकांसाठी गांधी ट्रेनिंग कॉलेज काढले.

साहित्यलेखन

क-हेचेपाणी हे पाचखंडातील आत्मचरित्र, चांगुणा, मोहित्यांचा शाप या कांदबरीचे लेखन केले. झेंडूची फुले व गीतगंगा हे कवितासंग्रह लिहिले. अशा गोष्टी अशा गंमती, कशी आहे गम्मत, कावळ्यांची शाळा, फुले आणि मुले, बत्ताशी आणि इतर कथा ही कथासंग्रहाची पुस्तके लिहिली. अध्यापक अत्रे, आषाढस्य प्रथम दिवसे, इतका लहान एवढा महान, केल्याने देशाटन, क्रांतिकारकांचे कुलपुरुष, चित्रकथा भाग-१, चित्रकथा भाग-२, दलितांचे बाबा, दूर्वा आणि फुले, मराठी माणसे, मराठी मने, महापूर, महाराष्ट्र कालचा आणि आजचा, मी कसा झालो?
मुद्दे आणि गुद्दे, वस्त्रहरण
तसेच विनोद गाथा लेखन केले. विनोबा, संत आणि साहित्य, समाधीवरील अश्रू, सिंहगर्जना, सुभाष कथा, सूर्यास्त, हंशा आणि टाळ्या, हुंदके या पुस्तकांबरोबर नाटकांचेही लेखन केले. अशी बायको हवी, उद्याचा संसार, एकच प्याला-विडंबन, कवडीचुंबक, गुरुदक्षिणा,
घराबाहेर, जग काय म्हणेल?, डॉक्टर लागू, तो मी नव्हेच, पराचा कावळा, पाणिग्रहण, प्रल्हाद(नाटक), प्रीतिसंगम (नाटक), बुवा तेथे बाया, ब्रम्हचारी, भ्रमाचा भोपळा, मी उभा आहे,मी मंत्री झालो, मोरूची मावशी, लग्नाची बेडी, वंदे भारतम, वीरवचन, शिवसमर्थ, सम्राट, सिंह, साष्टांग नमस्कार.

नाशिक येथे १९४२ मध्ये भरलेल्या सत्ताविसाव्या महाराष्ट्र साहित्य-संमेलनाचे ते अध्यक्ष होते. अडतिसावे नाट्यसंमेलन (बेळगाव, १९५५), दहावे मराठी पत्रकार-संमेलन (१९५०) आणि बडोदे, इंदूर व ग्वाल्हेर येथील प्रादेशिक साहित्यसंमेलने यांची अध्यक्षपदेही त्यांनी विभूषित केली होती. मुंबई येथे  त्यांचे निधन झाले. सासवड, पुणे, मुबंई व लंडन या ठिकाणी बी. ए., बी. टी., टी. डी. पर्यंत शिक्षण. नंतर पुण्यातील कँप एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत प्रथम शिक्षक व पुढे प्राचार्य म्हणून काम केले. तेथे असतानाच राजा धनराज गिरजी हायस्कूल (१९२७) व मुलींचे आगरकर हायस्कूल (१९३४) या शाळांच्या संस्थापनेत भाग घेतला. पुण्याच्या नगरपालिकेचे काही काळ ते सदस्य होते. १९३३ पासून नाट्यक्षेत्रात व पुढे चित्रपटसृष्टीतही त्यांनी प्रवेश केला. १९३९ नंतर मुंबईला स्थलांतर. १९४० त सुरू केलेल्या साप्ताहिक नवयुगपासून अखेरपर्यंत वृत्तपत्रक्षेत्रातच ते राहिले. याचबरोबरच ‘अत्रे थिएटर्स’ या नाट्यसंस्थेमार्फत रंगभूमीशीही त्यांचे व्यावासायिक संबंध होते. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात त्यांनी आपली वाणी व लेखणी यांद्वारे मोठे कार्य केले.

प्रथम ‘मकरंद’ व नंतर ‘केशवकुमार’ या टोपणनावांनी काव्यलेखन. झेंडूची फुले (१९२५) हा त्यांच्या विनोदी व विबंडन-कवितांचा संग्रह. त्यात जुन्या वळणाचे विशेषत: ‘रविकिरणामंडळा’ चे कवी व त्यांच्या कविता यांतील लकबांचे व वैगुण्यांचे विडंबन केलेले आहे. आधुनिक मराठीतील विडंबनकाव्याची परंपरा उपर्युक्त काव्यसंग्रहापासून मानण्यात येते. बालकवी व गोविंदाग्रज यांच्या कवितांचा ठळक परिणाम दाखविणारी त्यांची अन्य स्फुट कविता गीतगंगा (१९३५) या संग्रहात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा