साहित्याची पायवाट

गुरुवार, २६ सप्टेंबर, २०१३

2) शाहिर सगनभाऊ

२) शाहिर सगनभाऊ


लेखक- दशरथ यादव,पुणे

----------------------


जेजुरीचे रहिवासी सगन 

तुणतुण्याला ताण देऊन डफावर थाप पडली की मराठी मन शहारुन उठतं. नसानसातून शूरत्वाचा वारसा सळसळू लागतो. वैभवशाली इतिहासाबद्दल अभिमान बाळगणारे मराठी मन पोवाड्यामागील पराक्रमांच्या वर्णनाने भारावून जाते. शाहिरी संकल्पना अन्य भाषेतून घेतली असली तरी त्याचा गाभा अस्सल मराठीपणाने रसरसलेला आहे. शाहिरीतून अनेक पिढ्यांचा इतिहास उलगडत जातो. पेशवाईच्या काळात वीर रसाबरोबर शृंगार रसाचीही शाहिरीमध्ये भर पडली. श्रीमंत नानासाहेब पेशवे व दुसरे बाजीराव पेशवे यांच्या काळात शाहिरीला राजश्रय मिळाला. उत्तर पेशवाईत मराठी शाहिरीला बहर आला. मराठी स्त्री पुरुषाच्या प्रेमाचे चित्रण करणारे लावणी वाडःमय भरभरुन लिहिणारे, अनंतफंदी (इ.स.१७४४ ते१८९९), रामजोशी (इ.स.१७५८ते १८८३), शाहीर परशराम (इ.स.१७५४ते१८४४), होनाजी बाळा (इ.स.१७५४ते१८४४), प्रभाकर (इ.स.१७५२ते१८४३), सगनभाऊ (इ.स.१७७८ते१८५०) यांच्या जीवनासंबधी व त्यांनी लिहिलेल्या लावण्याबाबत मराठी माणसांच्या मनात कुतूहल व आकर्षण आहे.
शाहिर सगनभाऊ हे पेशवाईतील अखेरचे ज्ञात असलेले शाहीर. कोणतीही साहित्य परंपरा पाठीशी नसताना सहज सोप्या भाषेतील रचनांमुळे नावलौकिकास पात्र ठऱले. शाहीर सगनभाऊ मुळचे जेजुरी (ता.पुरंदर) येथील रहिवासी. वंशपरंपरेने आलेल्या शिकलगारीच्या व्यवसायात मन रमेना व काव्यप्रतिभा स्वस्थ बसू देईना म्हणून पुण्याला गेले. नामवंत शाहिरांसोबत आपली कवने सादर करु लागले. थोड्याच कालावधीत यश व प्रसिद्धी मिळाली. सगनभाऊ जातीचे मुसलमान असूनही ते मराठीशी महाराष्ट्राच्या  संस्कृतीशी एकरुप झाले होत. हत्यारांना धार लावण्याचा त्यांचा धंदा. पण पिढीजात धंद्यात विशेष रस नसल्याने शाहीरीत रमले. तो नाथसंप्रदायी असून, मराठी संत व हिंदू धर्म परंपरा याचा जाणकार होता.सिंधू रावळ हा नाथपंथी शाहीर त्याचा गुरु होता. आपल्या लावण्यांत तो विठ्ठल, पंढरी, ज्ञानेश्वर, जनाबाई, तुकाराम ह्यांचा उल्लेख अनेकदा करतो. दुस-या बाजीरावाचा त्याला आश्रय होता. त्याच्या विलासावर त्याने लावण्या रचल्या. होनाजीबाळाशी त्याची चुरस असे. सगनभाऊ उतम लावण्या लिहित. सगनभाऊंच्या अनेक लावण्या कमालीच्या शृंगारिक आहेत. तथापि त्या भेदिक आहेत. असा ही दावा करण्यात येतो.  त्याकाळात गवळ्याचा फड व रावळचा फड असे दोन फड पुण्यात होते. गवळ्याच्या फडाचा प्रमुख होनाजी तर रावळाच्या फ़डाचा प्रमुख सगनभाऊ होता.  होनाजीप्रमाणे त्यानेही रागदारीत रचना केली आहे.

कोथळे गावचा भाऊ गोंधळी

---------------------------
होनाजी शिलारखाने व त्यांचा गायक साथीदार बाळा करंजकर यांना जसे एकत्रित होनाजी बाळा असे नाव मिळाले. सगन मुस्लीम धर्मीय होता. जेजुरीपासून पाच किलोमीटरवर क-हा नदीच्या काठावर असलेल्या कोथळे गावचा रहिवासी भाऊ गोंधळी हा त्याचा सहगायक होता, म्हणूनच सगनभाऊ असे एकत्रित नामाभिधान झाले. जेजुरीकरांच्या मनात आजही सगनभाऊ बद्धल प्रेम व अभिमान आहे. जेजुरीत नोंव्हेंबर मध्ये सांस्कृतिक महोत्सवात ही रात्र शाहिरांची, लोकनाट्य, लोकसंगीत असे कार्यक्रम रंगविले जातात. भाऊ गोंधळी यांच्या गावी मात्र अजूनही त्यांचे भव्यदिव्य असे स्मारक नाही. लोकांना त्यांचा प्रेरणादायी इतिहास ज्ञात नाही. काही जणांच्या मनात स्मारक बांधण्याचा विचार आहे. त्याला मूर्तस्वरुप अद्याप आले नाही. सगनभाऊच्या  फडात गाणा-या पैकी राम गोंधळी हा उत्कृष्ठ आणि विशेष प्रसिद्ध होता. जेजुरीत खंडोबाचे भक्त म्हणून मुरळी व गोंधळी सोडण्याची प्रथा होती. हे भक्त म्हणजेच गोंधळी. ते खंडोबाची स्तुतीपर कवने रचून जागरण गोंधळाच्या कार्यक्रमात धार्मिक विधीबरोबर लोकांचे मनोरंजनही करी. त्यातूनच ढोलकीफडाच्या तमाशातही ते काम करीत. मुरळी देव देवतांचे कार्यक्रम करी.
सगनभाऊनी हिंदू देवांवरही कवने केली आहेत.खंडोबावर त्यांची श्रद्धा होती.
प्रातःकाळी उठूनी गणपतीचे, करि विष्णू स्मरण
काशी उज्जैनी, औंढी परळी, त्र्यंबक त्रिनयन
सोमनाथ सोरटी, बद्रिकेदार रामेश्वरी स्नान
श्रीशैल्य मल्लिकार्जुन, वेरूळ मांधाता जाण.

शृंगारिक लावणी 

---------------------
सगनभाऊ यांच्या लावण्या आजही तमाशात व बैठकीत गायल्या जातात. रचना भावनोत्कट, प्रत्ययकारी वणर्णनांनी सजलेल्या असून, भाषा सहजसुंदर आहे. लावण्यातील शृंगारात नाजुकपणा व संयम अधिक होता. एकनिष्ठ, पतिव्रता, धर्मश्रद्धा, याबाबतचे हिंदूसंस्कार त्यामध्ये स्पष्ट दिसतात. अनंतफंदीपासून शृंगाराला सुरवात झाली. सगनभाऊच्या काळी रसिकतेने मर्यादा ओलांडली.बिभत्स,अश्लील, आडपडदा न ठेवता लावणीकार सर्व वर्णन करीत होते. त्यावेळी सगनभाऊनी शृंगारिक लावण्या रचल्या. स्वंतत्र, विचार मनोहार कल्पना यांची सांगड कवनात घातली. उतान शृंगार, डौलदार रचना, बैठकीच्या चाली यामुळे लावण्या लोकप्रिय झाल्या. त्यांनी लावणीतून मराठी राज्य व संस्कृतीचे दर्शन घडविले.
नाकी नथ हालती नागीन
डुलती शृंगाराचा काय नखरा,
किंवा
लाल भडक वेणी स़डक आति चमेली मधी भिजली।
गोरे गाल जपून जाल, मजा पहाल फाकडे।

अशा वर्णनाच्या लावण्या त्यांनी रचल्या.
  लावणीची जुनी परंपरा त्यांच्या मृत्यूनंतर संपुष्ठात आली असे जुने लोक मानतात. सगनभाऊकृत लावणी व पोवाडा भाग १ संग्रह प्रकाशित आहे

पोवाड्यांची रचना

पेशवाई बुडाल्यानंत सगनभाऊ साता-याला छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज प्रतापसिंहाच्या आश्रयाला आल्याचे दिसते. प्रतापसिंहावर त्यांनी पोवाडे लिहिले. इंग्रजांनी प्रतापसिंहाना पदच्यूत केल्यानंतर त्यांची रवानगी काशीला केली. हा पोवाडा त्यांनी लिहिला आहे. ग्रामीण जीवनशैली त्यांची जी नाळ बांधली होती ती त्यांच्या शाहिरीतून दिसून येते. उत्तर मराठेशाहीतील सर्वात मोठी घटना, मराठ्यांच्या मनात असणारी सल म्हणजे पानिपतची लढाई,  या लढाईवर सगनभाऊनी प्रदीर्घ पोवाडा लिहून त्याकाळीतील परिस्थितीचे सुंदर भाष्य केले. खंडेरायावर त्यांची अपार श्रद्धा होती. देवदेवतांना आपल्या काव्यामध्ये गुंफले. हीच रचना खंडेरायाच्या भूपाळीमध्ये म्हटली जाते.
खडकीच्या लढाईवरील पोवाडा, दुस-या बाजीरावाचा पोवाडा, पानिपतचा पोवाडा हे त्यांचे काही प्रसिद्ध पोवाडे.

दळणासारखे किडे रगडले रडती नरनारी।
लेकराला माय विसरली, कसा ईश्वर तारी।

असे खडकीच्या लढाईचे अस्वस्थ करणारे वर्णन त्यांनी केले.


पानिपतची लढाई (पोवाडा)

भाऊ नाना तलवार धरून । गेले गिलच्यावर चढाई करून ॥ध्रुपद॥
सवाई बाजीराव पेशवे पुण्यवान प्रधान । नाना भाऊ गादीवर शूर जन्मले जैसे अर्जुन ॥ शहर सवाई बाजीराव पेशवे पुण्यवान प्रधान । नाना भाऊ गादीवर शूर जन्मले जैसे अर्जुन ॥ शहर पुणे वसविले मोहरा पुतळ्यांला नाही काहि उणे । चमके नंगी तलवार सैन्य हे सारे लष्कर पाहून ॥ गर्व कोंदला फार जैसा लंकापती रावण । होणारासारखे अक्षर कैसे लिहिले ब्रह्माने ॥( चाल )॥ नामांकित सरदार थोर । नामे ऐका तपशीलवार ॥ बोलावून अवघे वजीर । सजवृनया सभा सदर ॥ मग कैसा केला विचार । लिहिली एकच तार ॥ अष्टप्रधान पानकरी सार । जरीपटकाऐंशी हजार ॥ गाईकवाड सैनापती भार ॥ भाला ऐंशी हजार होळकर । बारा हजार बाणांची कतार । चाळीस हजार भोसले नागपुरकर ॥ वीस हजार अरब सुमार । तीस हजार हपशी बरोबर ॥ आले मल्हारराव होळकर । फौजेमध्ये कुल अकत्यार । अठरापगड लोक सार ॥ आपल्याला भिसलीवर ॥( चाल )॥ चाळीस हजार पठाण नित्य तेघे चमकती । अर्बुज जात ही खंदी फिरे भोवती ॥ सिंध जाट रोहिला नाही त्याला गणती । घोरपडे नाईक निंबाळकर नौबद वाजती ॥ घाटगे मोहिते माने पाटणकर झुकती । ढालेशी ढाल भिडे जरीपटक्याचे हत्ती ॥ हे मानकरी भाऊचे ऐसे दुनया बोलती ॥ एक एकाबरोबर ऐसै पतके किती । चाळीस हजार सडक करनाटकची चमकती । बाराभाई जमले नाही त्यांची गणती ॥ सांडणीस्वाराची डांक फिरेभोवती ।..........॥ अशी जमाबंदी करून । भाऊ नाना ॥१॥

शाण्णव कुळीच भूपाळ सारे मानकरी बरोबर ॥ धायगुडे पायगुडे मोरे शेडगे पांढरे महाशूर ॥ खल्लाटे लोखंडे भिसे वाघमारे आणिक हटकर । शेळके बोळके काळे खचल खराडे नाही त्याला सुमार । शिरके महाडिक मिसाळ पिसाळ बोधे बरगे आहेत बरोबर । जाधव धुळप पोळ चवाण डफळे भोसले गुजर रणशूर ॥ लिगाडे कदम फडतारे घाडगे यादव थोरात भापकर । आंगरे इंगळे शेवाळे शितोळे रणदिवे वाबळे खळदकर ॥ गाढवे रसाळे जगताप जगदाळे काकडे काटकर । बोबडे ढुबल भोइटे लिंगाडे सांवत खिरसागर ( क्षीरसागर ) । गोडासे निकम दुधे फाळके धुमाळ गजरे वालकर तेरदाळकर । बागल कोकाटे कडमकर रणनवरे कालेवार आयरेकर ॥ हे सारे सुभे भाउचे उभे आपलाल्या बाजूवर ॥( चाल )॥ चाळीस हजार करवल जमले । सोडिले शिरावर समले ॥ रास्ते पटवर्धन नाही गमले । ढमढेरे तळेकर तुमले ॥ आले पंत जागा त्यांनी आखले । कितुरकर देसाई हाती भाले हैदराबादकर मोंगल आले ॥ मंत्री चिटणीस नरगुंदवाले । कोल्हटकर महारा? खटाववाले ॥ कुडुकवाल्यांनी खजिने पाठविले । गोवेकर फरास पुढे गेले ॥ लहान लहान मानकरी चुकले । थोर थोर जमेसी धरले ॥ नाना फौज पाहतांना चकले ॥ दलबादल डेरे दिधले । नगारखाने झाडू लागले ॥ गोसावी त्यामधि वायले । फक्क्ड ते सोटेवाले ॥ मग लाग्नण कितीक आले ॥ बावन पागा फारच झाले ॥( चाल )॥ कोतवाल घोडे सजविले श्यामकर्ण । भरगच्ची हत्तीवर झुला दिसे आरूण ॥ अयन्याची अंबारी गगनी तारांगण । आघाडी चालली लगी भडक निशाण ॥ सूत्रनाळी जंबुरे उंटावर रोखुन । खंडा ?? सुरे तिरकमान कटार लावून ॥ ढाल फिरंग नवाजखाणी निशंग गगन लकेरी खुन । पिस्तुल बंदुक चकमक चमके संगीन ॥ कराबीन बकमार याची खूण । राहिले एकदिल खूण करून ॥ जमराडे सरदार झांबरे शूर अतिरथी । लई धनगर शाण्णव कुळीचे मराठे होती ॥ ह्त्यार जमई जमदाड माडु घेऊन हाती । बिचवा लवंगी गुरगुज सांग सोटा बरची फेकिती ॥ सुरसेप दारूचे कैफ धुंद लढयेती । फसत बालमपेच खुबचार मारलई होती ॥ देणे महाराजांचे परिपूर्ण । चाले फौज काय पाहता दुरून ॥ भाऊ नाना. ॥२॥

नाना भाऊंनी विचार केला फौजा पहाव्या म्हणून । स्वारी निघाली बाहेर दर्शना पर्वतीच्या कारण ॥ डंके झाले चहूंकडून घोडयावर ठोविले जीन । भले भले सरदार चालती आपआपल्या मिसलीन ॥ पेंढार पुढे तोफा चालल्या दारू गोळा बार भरून । हत्तीवर सूत्रनाळ उंटावर बाण भरूण ॥ बारा हजार उंट बाणांच्या कैच्या मागे चाले दबा धरून । कराबीन बक्कामार आरब सिंध रोहिले गोलचे गोल भरून ॥ करवलवाले एकांडे पन्नास हजार रहदारी करून । बासडीवाले धनगर निवडक बाजूवर ठरून ॥( चाल )॥ पुढे होळकर चालला । शिंदेशाई नाही ( येत ) गणतीला ॥ साडेसातशे कोतवाल सजविला । त्यांला भरगच्ची झुला ॥ सहा हजार तोफा बार भरला । पायदळ निशाण कडक पुढे उडाला ॥ चार हजार सोटेवाला । सात हजार बल्लमवाला ॥ गोलचा गोल नाईक आला । मागे फौज करनाटकवाला ॥ बावन पागा बारगीर जमला ॥ माय मोर्तब आले गणतीला । साठ मानकरी मोरचलवाला ॥( चाल )॥ रंगविले हत्ती पाखरा भरजरी जरा । अंबारी साडेसातशे मोती झालरा ॥ नाना भाऊंनी करून पोषाग चंदेरी तर्‍हा । गळा कंठी पाच शिरपेच मोत्यांचा तुरा ॥ कपाळी केशरी टिळा चंद्र दुसरा । हौद्यांत बसून शाहीचा घेत मुजरा ॥( चाल )॥ नऊ लाख सैन्य एकदिल घोडा शिरा । तीस हजार अबदागिरी बरोबर चाले ढिगारा । संगे झडती चौघडे शिंगे तुतारा ॥ पर्वतीचे दर्शन घेऊन येत माघारा । असा गवे चढून ॥ शहर पुण्यास मुजरा करून । भाऊ नाना. ॥३॥

पोवाड्याचे शेवटचे कवन

शके सोळाशे पांसष्ट फाल्गुन वद्य षष्ठी आदितवार ॥ नऊ रात्र नऊ दिवस लढाई मग फिरले माघार ॥ सातशांनी धरली वाट पुण्याची निर्माल्य लष्कर । खेडया - खेडयाचे पाटिल लुटती महार चांभार । बेदड घालिती छापे वाट चालेना तिळभर ॥ पुढे बिकट बारी कैसा तारील परमेश्वर । असे सांडाव देत आले अटक अटक उतरून नऊ कोशांवर ॥(चाल)॥ तिथून अवघे फुटले पुण्याचे रस्ते भुलले ॥ फारदिसा भुलीमधे गुंगले ॥ नऊखंड फिरता चकले । अन्नाविण वाळून सुकले ॥ भक्षिती झाडांचे पाले । गोसावी कितीएक झाले ॥ तुंब हाती घेतले । किती रामेश्वराकडे झुकले ॥ काशीचे रस्ते धरले । या रितीनें सैन्य खपलें ॥ दैवाचे पुण्याशीं आले । लाखोटे सदरेवर पडाले ॥ दुःखांचे सागर फुटले ।........॥(चाल)॥ लाखोटे वाचिता झाले अवघे घाबर । नानाभाऊ बुडाले पुण्यास आली खबर ॥ नानाभाऊ बुडाले परंतु लौकिक दुनयावर । नवलाख बांगदी फुटली असा हाहाकार ॥ दक्षिण बुडाली सती पडल्या महामूर । श्रीमंताच्या तक्तापाशी भले भले मनसुबीदार ॥ स्थापिले गादीवर माधवराव नेणार । सोन्याची जळली भट्टी उरले खापर ॥ शाहू छत्रपतीचे देणे सांब अवतार । गातो सगनभाऊ ठिकाणा शाहुनगर ॥ गातो फत्तेजंग पोवाडा करून । भाऊ नाना०॥११॥





1 टिप्पणी: