पुरंदर
क-हाकाठी मातीतून
घुमतो एक पुकार
मर्द मराठ्यांनी इथे
गाजवली तलवार
उसळून कोसळे वीर
मुरारबाजी हा थोर
कारकुड किल्लेदार
बेंगळे मानीना हार
किल्ल्यावर होते
मावळे चिमूटभर
ढासळले हे दगड
सपासप केले वार
ध़डाडून पडल्या तोफा
दिलेरखान झाला गार
हर हर गर्जनेने
शत्रू भेदला आरपार
अभेद्य होता पुरंदर
वज्रगड त्याच्या आड
शत्रू कापी चराचरा
मोगलांची मोडे खोड
शिवशाही बीज इथे
मातीत रुजली खोल
शंभू शिवाचा हा छावा
बोलतो बोबडे बोल
लढताना हो पडला
बाजी पासलकर
गरगरा फिरे पट्टा
गोदाजी करी कहर
दौलत मराठ्यांची
पानीपतात गेली
बेईज्जत महाराष्ट्राची
यो पेशवाईत झाली
कुंजीर कामठे माने
जाधवराव पोमण
जगताप खेडेकर
इंगळे काळे रोमण
५२ सरदार इथले
अटकेपार लावी झेंडे
पुढे जानोजी भिंताडा
लढे मानाजी पायगुडे
मातीला इथल्या येतो
गंध या इतिहासाचा
द-या खो-यातून घुमतो
आवाज शिवशाहीचा
क्रांतीवीर उमाजीनं
इंग्रज केला हैराण
या कडेकपारीतून
त्याचं उठवलं रान
बुलंद बाका पठारी
मंदिरे शिवाची सात
सात गडांचा पहारा
खडाच नऊ घाटात
भंडा-यात न्हाला गड
पैलतीरी भुलेश्वर
क-हा घेऊन कवेत
नांदतो पांडेश्वर
रामायण लिही वाल्ह्या
घडवून चमत्कार
म्हस्कोबा गुलालाने
रंगवितो गाव सारे
भिवरी बोपगावाला
कानिफनाथांचा वास
पोखर नारायणपूरला
दत्त मंदिरी आरास
मराठी पिळाची पगडी
गडकोट बहारदार
स्वाभिमानी हा बाणा
माझा जपतो पुरंदर
सोपानाने शेवटचा
श्वास इथेच घेतला
घे-यातल्या मावळ्यांनी
छातीचा केलाय कोट
चिव्हेवाडीनं धरलं
काळदरीचे हे बोट
पानमळा बागाईत
वीर परिंचे खो-यात
सीताफळ अंजिराने
गु-होळी राजेवाडीत
छत्रपती शिवाजींचा
उद्धार फुल्यांनी केला
कुळवाडी भुषण ऱाजा
सांगितला हो जगाला
बेलसर व नाझंर
क-हामाईची लेकर
दिवे,सोनोरी माहूर
गडाचे किल्लेदार
नीरा क-हेच्या खो-यात
असा इतिहास घङला
कुणब्यांनी इथल्या
दुष्काळ मातीत गाडला
पुरंदराच्या मातीत
निसर्गाची नवलाई
फळे फुले पालेभाज्या
इथे पिके आमराई
क-हाकाठाची मंदिरे
खुणावती पुन्हा मला
शिवशाहीचे तोरण
म्हणे बांधायचे तुला
पुरंदराच्या भूमीत
जन्म पुन्हा पुन्हा व्हावा
मातीने कणा कणात
इतिहास जागवावा
दशरथ यादव, पुणे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा